लखनऊ – उन्हाळ्यातील प्रखर उष्णतेचा विपरीत परिणाम टोमॅटो पिकावर झाला आहे. उत्तर प्रदेशात टोमॅटो चक्क २ रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या वर्षी याच काळामध्ये टोमॅटोचा दर ४०० ते ५०० रुपये प्रति कॅरेट असा होता.
उष्णतेचा परिणाम तसा सर्वच भाज्यांवर झाला आहे. मात्र टोमॅटोला उष्णतेचा मोठा फटका बसू लागला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये टोमॅटोची परिस्थिती खराब दिसत आहे.घाऊक बाजारात टोमॅटो २ रुपये तर किरकोळ बाजारात टोमॅटोला किलोमागे ५ रुपये दर मिळत आहे.यंदा टोमॅटो प्रति कॅरेट १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे. दर कमी असल्यामुळे अनेक शेतकरी टोमॅटो तोडत नसल्याने शेतामध्येच टोमॅटो सडत असल्याचे दिसत आहे.एकंदर उत्तर प्रदेशातील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. टोमॅटो स्वस्त झाल्याने त्याचा फायदा मात्र सर्वसामान्यांना मिळू लागला आहे.