अमरोहा – उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका सरकारी शाळेच्या परिसरात बिबट्याच्या जोडीचे दर्शन झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या खोल्यांमध्ये बंद करुन ठेवले. त्यानंतर गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली असता बिबट्याची जोडी जंगलात पळून गेली.अमरोहा येथील एका सरकारी शाळेत आज सकाळी नियमित वर्ग सुरू असतानाच शाळेच्या परिसरात बिबट्याची एक जोडी फिरत असताना दिसली. शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर त्यांनी तातडीने सर्व वर्गांच्या खोल्या बाहेरुन बंद केल्या. या बिबट्यांची माहिती त्यांनी फोनवरुन गावातील लोकांना दिली. त्यानंतर गावकरी हातात लाठ्या काठ्या घेऊन शाळेकडे आले. गावकऱ्यांचा गोंधळ ऐकून बिबट्याच्या या जोडीने जंगलात पोबारा केला. शाळेने वनविभागाच्या पथकालाही बोलावले, त्यांनी बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगलाच्या दिशेने बिबट्याच्या पायाच्या खुणा दिसल्या असून त्यांनी शाळेजवळ पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.
