राजापूर – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज राजापूरच्या तेल रिफायनरी विरोधात दौर्यावर बारसूला आले तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर जणू पाळतच ठेवली होती. उद्धव ठाकरेंची दोन ठिकाणी गावकर्यांशी भेट आणि पत्रकार परिषद होऊन दीड तास होत नाही तोवर तेथील तहसीलदारांचा अधिकृत सरकारी अहवाल वायुवेगाने उदय सामंतांच्या हाती पडला आणि तितक्याच वायूवेगाने उद्योग मंत्र्यांनी फेसबूक लाईव्ह करीत आकडे सांगत जाहीर केले की, गावकर्यांपेक्षा बाहेरच्यांची उपस्थिती अधिक होती.
ज्या वेगाने तहसिलदारांनी अधिकृत शासकीय अहवाल आणि उपस्थितांची माहिती घेऊन मोजणी केली ते पाहून तहसिलदारांचा सरकारने विशेष सत्कार करून पारितोषिक द्यायला हवे. सामान्यांना या वायूवेगाचा कधीच अनुभव येत नाही. उदय सामंत यांनाही हा अहवाल जाहीर करण्याची जी घाई झाली होती ती पाहता नक्की झाले की, सरकार काहीही करून बारसूत रिफायनरी आणणारच आहे. केंद्राकडून यासाठी प्रचंड दबाव आला आहे. याचसाठी उद्धव ठाकरेंसमोर दिसलेली गर्दी ही स्थानिकांची नव्हती हे सांगण्याची घाई उदय सामंतांनी केली. त्याचवेळी रिफायनरी समर्थकांच्या बैठकीला 500 जण उपस्थित आहेत हे आवर्जून सांगताना तिथे बाहेरचे किती आणि पत्रकार किती हे मात्र सांगितले नाही. चांगले प्रकल्प गुजरात, दिल्लीला दिले आणि विनाशकारी प्रकल्प राज्याला देता? असा सवाल करत रिफायनरी गुजरातला न्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आज बारसू दौर्यानंतर विरोधकांना दिले. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही. बारसूला दडपशाही सुरू आहे, त्यामुळे यात नक्की काही काळंबेरं आहे. पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. हुकुमशाही पद्धतीने प्रकल्प लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूरमध्ये निलेश आणि नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला मात्र मूठभर लोकांनीच हजेरी लावली होती.
‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द’ अशा घोषणा देत ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. गिरमादेवी कोंड, राजापूर, देवाचे गोठणे, सोलगाव फाटा, राजापूर येथे ग्रामस्थांशी ठाकरे यांनी चर्चा केली. बारसूच्या सड्यावर त्यांनी कातळशिल्पांचीही पाहणी केली. ते म्हणाले, ‘जसे पत्र मी या प्रकल्पाबाबत दिले होते. तसेच कातळशिल्पाबाबतही दिले होते. या कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा, अशी मागणी मी केली होती.’
बारसूतील ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी बारसूत प्रकल्प आणावा असे पत्र लिहिले होते. मात्र लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा, असे मी म्हटले नव्हते. मी मुख्यमंत्री झाल्यावर गद्दारांनी मला सांगितले होते की, लोकांचा विरोध नाही, बरीचशी जमीन निर्मनुष्य आहे. हा प्रकल्प आला तर राज्याला फायदा होईल. त्यानंतर मी केंद्राला पत्र पाठवले. रिफायनरी होऊ शकते की नाही याची चाचपणी करा, असे मी म्हटले होते. मात्र प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. लोक विरोध करत असतील तर शिवसेना म्हणून मीही त्याचा विरोध करणार. समृद्धीच्या वेळेसही मी गेलो, तिथे मोसंबीची झाडे होती आणि ती जागा ओसाड म्हणून दाखवली होती. मग तो परिसर वगळून आम्ही दुसर्या दिशेने नेला. हुकुमशाहीच्या माध्यमातून प्रकल्प लादू नका, अन्यथा आम्ही महाराष्ट्र पेटवू. मी आज इथे येऊन उभा आहे. आता जे या प्रकल्पाचे समर्थन करत आहेत, त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर येऊन रिफायनरीचे समर्थन करून दाखवावे.’ ‘विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. महाराष्ट्राच्या वाट्याला राख आणि गुजरातच्या वाट्याला रांगोळी, असे होता कामा नये. वेदांता, फॉक्सकॉन महाराष्ट्राला द्या, हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला द्या. चांगले प्रकल्प गुजरात आणि दिल्लीला दिले आणि विनाशकारी प्रकल्प राज्याला देता. उपर्यांची सुपारी घेऊन तुम्ही ग्रामस्थांची मुस्कटदाबी करणार असाल तर आमचा विरोध आहे. माती परीक्षणासोबतच जनतेची मतेही विचारा. माती म्हणजे फक्त माती नाही, तिचे पुत्रही आहेत, त्या भूमिपुत्रांची मतेही विचारा. आमची प्रत्येक प्रकल्पाला नकारघंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला नसता. चांगले प्रकल्प गुजरातला दिले तेव्हा हे शेपूट घालून बसले होते. या गावकर्यांच्या घरावरती उपर्यांची सुपारी घेऊन वरवंटा फिरवण्याचे काम हे सरकार करत आहे. लोकांच्या हिताची गोष्ट आहे तर तुम्हाला बळाचा वापर का करावा लागत आहे?,’ असा सवालही ठाकरेंनी केला. दरम्यान, संध्याकाळी महाडमध्ये उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. या सभेत ते म्हणाले की, रिफायनरीला बारसूतील लोकांचा विरोध असेल तर आमचा विरोध असेल. असे असेल तर आम्ही बारसूमध्ये रिफायनरी होऊ देणार नाही.
दरम्यान, रिफायनरीला समर्थन देण्यासाठी राणे बंधू, प्रमोद जठार, राजन तेली यांनी राजापुरातून मोर्चा काढला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित होते. ‘होय मी समर्थक’ असे लिहिलेली टोपी या मोर्चेकर्यांनी घातली होती. बारसूच्या जवाहर चौकात रिफायनरी समर्थक जमले. ‘प्रकल्पाला विरोध करायला किती खोके घेतले? असा प्रश्न विचारत कोकणला लागलेला शाप म्हणजे उद्धव ठाकरे,’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
उदय सामंतांचे फेसबुक लाइव्ह
उद्धव ठाकरेंची बारसू भेट होते न होते तोच राजापूरच्या तहसीलदारांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना तातडीने अहवाल सादर केला. यानंतर तितक्याच तातडीने सामंत यांनी फेसबुक लाइव्ह करत माहिती दिली. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी गिरमादेवी कोंड येथे थांबून रिफायनरी विरोधकांशी चर्चा केली. त्यांच्यासह 350 लोक उपस्थित होते. त्यात ग्रामस्थ 150च्या आसपासच होते. उर्वरित बाहेरून आले होते. पत्रकारांची संख्या 20-25 होती. सोलगाव फाटा येथे ठाकरेंनी रिफायनरी विरोधक व ग्रामस्थांशी चर्चा केली. तेथे 200 ते 225 लोक होते, त्यापैकी ग्रामस्थ 100 होते. स्थानिक लोकांना भेटण्यासाठी ज्यावेळी महाराष्ट्रातील नेते जातात तेव्हा बाहेरून लोक आणण्याची गरज नाही. संपूर्ण दौरा पाहता, ग्रामस्थांशी बोलण्यापेक्षा ठाकरेंचा सर्व वेळ मुख्यमंत्र्यांविरोधात टीका करण्यातच गेला.’
राणेंच्या आत्मचरित्रात
रिफायनरीला ठाम विरोध
नारायण राणे यांनी चार वर्षांपूर्वी लिहिलेल्या आत्मचरित्रात कोकणातील रिफायनरीबाबत लिहिले आहे की, माझा राजकीय पाठिंबा कुणालाही असो, पण कोणत्याही प्रकारच्या रिफायनरीला माझा विरोध आहे आणि विरोध राहणार आहे. या प्रकल्पाला 6 हजार एकर जमीन लागणार आहे. 15 ते 20 लाख आंब्याची, काजूची झाडे तोडली जातील. 25 हजार लोक विस्थापित होतील.
राजन साळवींचे तळ्यात मळ्यात
आमदार राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी बारसू प्रकल्पाचे समर्थन केले होते. मात्र पुन्हा आपली भूमिका बदलून ते आज उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून प्रकल्पविरोधात उभे राहिले. दरम्यान, आज सोलगाव फाट्यावर प्रकल्पविरोधकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.