मुंबई – एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार फुटून गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर बहुमत चाचणीची वेळ आली, त्यावेळी बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आपसूकच कोसळले. हा अतिमहत्त्वाचा निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारले नव्हते, असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. पवार म्हणाले, मुख्यमंत्रिपद हे तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. राजीनामा देण्याचा निर्णय कोण घेत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेतल्याने दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने तेव्हा ही चर्चा झाली नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अदानी समूहाच्या ‘जेपीसी’ चौकशीवर देखील शरद पवारांनी भूमिका पुन्हा मांडली आहे. विरोधी पक्षातील सहकार्याचे वेगळे मत आहे. आम्हाला विरोधी पक्षात ऐक्य ठेवायचे आहे. त्यामुळे सहकारी मित्रपक्षांना ‘जेपीसी’ चौकशी व्हावी वाटत असेल, तर त्याला विरोध करणार नाही, असेही शरद
पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद सोडताना विचारले नव्हते! शरद पवारांचे वक्तव्य
