उद्धव व आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा भाजपाचा कट अनिल देशमुखांवर दबाव! श्याम मानव यांचा गौप्यस्फोट

नागपूर – तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते अनिल परब यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी कट आखण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे (अंनिस) संस्थापक सदस्य श्याम मानव यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. महत्वाचे म्हणजे अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांच्या दाव्याला दुजोरा दिला.
‘देवेंद्र फडणवीसांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून माझ्यावर दबाव आणला होता’, असे देशमुख यांनी सांगितले. या वृत्तावरून जोरदार चर्चा सुरू असताना दुपारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष नेमणुकीवरून देशमुख यांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा सीबीआयचा कोर्टात दाखल केलेला अहवाल उघड झाला. त्या मागोमाग फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना इशारा दिला की माझ्या नादी जो लागेल त्याला मी सोडत नाही. देशमुख हे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलतात त्याच्या टेप माझ्याकडे आहेत त्या मी उघड करू शकतो.
श्याम मानव यांनी आज आरोप केला की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कट राज्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याने आखला होता. मी त्या नेत्याचे नाव घेत नाही. कारण ते नाव स्वतः अनिल देशमुख यांनी घेतले आहे. देशमुख यांच्याकडे चार वेगवेगळी शपथपत्र पाठविण्यात आली होती. या शपथपत्रांवर सही करा, त्याबदल्यात तुमच्या मागे लागलेला ईडी , सीबीआय चौकशीचा ससेमिरा थांबवतो,अशी ऑफर देशमुख यांना देण्यात आली होती.
चार शपथपत्रांपैकी पहिल्या शपथपत्रात उद्धव ठाकरेंनी आपल्याला दरमहा शंभर कोटी रूपये हप्ता गोळा करून द्यायला सांगितले होते,असा आरोप करण्यास देशमुखांना सांगण्यात आले होते. त्यावर अनिल देशमुख यांनी सही करावी यासाठी दबाव आणण्यात आला होता.
दुसर्‍या शपथपत्रात दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आदित्य ठाकरे आणि त्याच्या काही साथीदारांनी दिशावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या करून तिला इमारतीवरून फेकून दिले, असा आरोप देशमुख यांना करण्यास सांगितले होते. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकामांचे आरोप झाले होते. त्या प्रकरणात परब यांना अडकवण्याचा प्रयत्न तिसर्‍या शपथपत्रात करण्यात आला होता. चौथे शपथपत्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडवण्यासाठी होते. अजित पवार यांनी आपल्याला गुटखा माफियांकडून कोट्यवधी रुपये खंडणी गोळा करण्यास सांगितले होते,असा आरोप देशमुख यांना करण्यास सांगितले होते. मात्र देशमुख यांनी या शपथपत्रांवर सह्या केल्या नाहीत. त्यानंतर त्यांना अजित पवारांना वगळून अन्य तिघांवर आरोप करण्याची गळ घालण्यात आली. पण देशमुखांनी त्यालाही नकार दिल्याने त्यांना गजाआड करण्यात आले,असा दावा श्याम मानव यांनी केला.
श्याम मानव यांनी हे खळबळजनक आरोप केल्यावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया देताना म्हटले की श्याम मानव जे म्हणाले ते खरे आहे. मी गृहमंत्री असताना फडणवीसांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मी आयुष्यभर तुरुंगात राहीन, पण कोणावरही खोटे आरोप करणार नाही, असे मी ठासून सांगितले होते, असे देशमुख यांनी सांगितले.
श्याम मानव यांनी यासंदर्भात मीडियाशी बोलताना शपथपत्र देण्यास कोण दबाव आणत होते त्याचे नाव घेतले नव्हते. मात्र त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देशमुख यांनी फडणवीस यांचे नाव घेतल्याने फडणवीस अडचणीत आले. त्यानंतर काही तासांतच जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी केलेल्या आरोपासंबंधीचा अहवाल सीबीआयने न्यायालयात सादर केल्याचे उघड झाले . जळगावचे पोलीस अधीक्षक असताना एका शैक्षणिक संस्थेतील संचालकांमध्ये झालेल्या वादात भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाव टाकला होता,असा आरोप मुंढे यांनी केला, असे सीबीआयने मोक्का न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

फडणवीसांचा पलटवार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांवर पलटवार केला. ते म्हणाले की शंभर कोटीच्या वसुलीच्या गुन्ह्यात देशमुख तुरुंगात गेले होते. ते अजून त्या प्रकरणातून सुटलेले नाहीत. ते जामिनावर बाहेर आले आहेत. उद्धव ठाकरे , शरद पवार यांच्याबद्दल देशमुख काय बोलतात याचे व्हिडिओ पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आली तर ते मी उघड करीन,असा इशारा फडणवीस यांनी देशमुखांना दिला.
श्याम मानव यांच्याबाबत मात्र त्यांनी संयमी प्रतिक्रिया दिली. ’श्याम मानव मला खूप वर्षांपासून ओळखतात. आरोप करण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते.पण सध्या सुपारी घेऊन बोलणारे लोक व्यवस्थेमध्ये घुसले आहेत. त्यांच्या नादी श्याम मानव लागले आहेत का असे मला वाटते असे फडणवीस म्हणाले