मुंबई – मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार पाऊस झाला .पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईला गुरुवारी दुपारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पण हवामान विभागाने उद्या सकाळी आठ पर्यंत रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. मुंबईत सकाळपासून सतत पावसाच्या सरी कोसळत असल्याने सखल भागात पाणी साचले होते. मुंबईसह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. जोरदार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा
१० ते १५ मिनिटे उशीराने सुरु होत्या.
पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. दादर, सायन, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, दहिसर, नालासोपारा, कल्याणमध्ये पाणी साचले होते. अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. मुंबई महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद केला होता. पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात वाढलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या १३ तुकड्या राज्यभरात तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईत जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी २०२० मध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता. या वर्षी १ जुलै ते आजपर्यंत १ हजार ५५७.८ मिमी एवढी नोंद झाली आहे. मुंबईतील कुलाबा येथे गेल्या २४ तासांत २२३.२ मिमी, सांताक्रूझ १४५.१ मिमी, वांद्रे १०६ मिमी, राम मंदिर १६१ मिमी, भायखळा ११९ मिमी , सीएसएमटी १५३.५ मिमी आणि सायन येथे ११२ मिमी एवढी नोंद झाली आहे. तर दहिसरमध्ये ७०.५ मिमी, चेंबूरमध्ये ८६.५ आणि माटुंग्यात ७८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार आणि तानसा हे दोन महत्त्वाचे तलाव मंगळवारी मध्यरात्रीनंतर ओव्हरफ्लो झाले. सात तलावांपैकी सर्वात लहान तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला. सातपैकी तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सात तलावांमधील एकूण पाणीसाठा क्षमतेच्या 59% वर पोहोचला आहे. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. बारवी धरणाची ७०.५ मीटर पाणीपातळी ७२.६ मीटर क्षमतेच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने उल्हास नदीकाठच्या अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.