उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच
दक्षिण पुण्यात पाणीटंचाई

पुणे- उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दक्षिण पुण्यातील विविध भागात पाणीटंचाई दिसून येत आहे.कात्रज,सुखसागर,साईनगर,कोंढवा, साईनगर आणि गोकुळनगर या भागात गेल्या १५ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वडगाव जल शुद्धीकरण केंद्रावरून येथील केदारेश्वर टाकीला पाणीपुरवठा होत असतो.या टाकीची क्षमता १ कोटी लिटर इतकी आहे.मात्र गेल्या १५ दिवसांपासून या टाकीला हाईट मिळत नसल्याने या टाकीतून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले की, वडगाव जल शुद्धीकरण केंद्रातील पाच पंपांपैकी एक पंप नादुरुस्त झाला होता. त्यात पंपाच्या जागी कमी क्षमतेचा पंप बसविण्यात आला होता.त्यामुळे या टाकीला पाणीपुरवठा कमी होत होता.तसेच फ्लो मीटर बसविण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.आता हा पंप दुरुस्त करण्यात आला आहे.या जल केंद्रातील पाचही पंप आता सुरू असून पुढील दोन दिवसांत या भागांचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत होईल,पावसकर म्हणाले.

Scroll to Top