नाशिक – शनिवार 13 मे रोजी उरूस झाल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास इतर धर्माच्या काहीजणांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मंदिर प्रशासनाच्या गार्डनी त्यांना अडविले. मात्र या प्रकारामुळे शनिवार रात्रीपासून तणावाचे वातावरण आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर रात्री 9 वाजता बंद होते. मात्र उरूस झाल्यानंतर काहीजणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. उत्तर दरवाजापर्यंत हा जमाव आला होता. मंदिराच्या रखवालदारांनी त्यांना अडवल्यावरही ते हटेनात. अखेर मंदिर प्रशासनाने त्यांना बाजुला नेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण संघानेही पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे. देवस्थान ट्रस्टचे म्हणणे आहे की, दरवर्षी मंदिर परिसरातूनच उरूसाची मिरवणूक जाते आणि बाहेरील पायरीपर्यंत प्रवेश घेऊन चादर तेथेच सादर होते. यावेळी मंदिर बंदच असते, मंदिरात कुणी प्रवेश करीत नाही. मात्र याच वर्षी काही तरुणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट धरला. इतर धर्मियांना प्रवेश करण्यास मनाई असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पण ते प्रवेशासाठी हटून राहिल्याने तणाव निर्माण झाला. ते असे का वागले याची चौकशी करणे आवश्यक आहे.
पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुरोहित संघाने संशयितांवर कारवाईची मागणी
केली आहे. दरम्यान, भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले म्हणाले की, हा कोणता जमाव होता जो मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होता, त्याची चौकशी होणे
गरजेचे आहे.
उरूसनंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न! तणावाचे वातावरण
