उल्हासनगर : येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील पुढील सज्जा कोसळला. हा सज्जा रस्त्यावर कोसळला, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
उल्हासनगर कॅम्प 4 च्या 29 सेक्शन परिसरात मंगलमूर्ती अपार्टमेंट ही पाच मजली इमारत आहे. ही इमारत 1995 साली बांधण्यात आली होती. ह्यात एकूण 26 सदनिकाधारक राहत होते. 2015 साली सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारतीमधील स्लॅब कोसळले. त्यानंतर महापालिकेने इमारत खाली करून दुरुस्तीची परवानगी दिली होती, परंतु सदनिकाधारकांनी आतापर्यंत इमारत रिपेरिंग न केल्याने संपूर्ण इमारतच जीर्ण होऊन कधीही कोसळू शकते अशा अवस्थेला आली आहे.
आज दुपारी अचानक पाचव्या मजल्यावरील पुढील सज्जा रस्त्यावर कोसळला. सुदैवाने रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणीही जखमी झाले नाही परंतु येथील आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून इमारतीची पाहणी करून ढिगारा हटवण्याचा काम करण्यात आले. महापालिकेने आजूबाजूच्या नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटीसी बजवण्यात आल्या आहेत. सदर इमारत जीर्ण झाल्याने कधीही कोसळू शकते, त्यामुळे येथील नागरिकांना धोका आहे. महापालिकेने सदर इमारत तात्काळ जमीनदोस्त करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.