मुंबई- महाराष्ट्रात एच३एन२ हा नवा संसर्गजन्य रोग आला आहे. मागील तीन दिवसांमध्ये राज्यात ३ जणांचा याने मृत्यू झाला. त्यामुळे याची दखल राज्य सरकारने घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एच३एन२ संसर्गाबाबत आढावा बैठक घेऊन नवे आदेश दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोविड आणि एच३एन२ या दोन्ही संसर्गजन्य आजारांची लक्षणे सारखीच आहेत. त्याचबरोबर याच्या प्रसाराची कारणेही सारखी आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या. गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तर, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी, अशी सूचना दिली. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्याबाबतही सूचना दिल्या.