मुंबई –
एच३एन२ आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व खासगी क्लिनिकमधील डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रुग्णांमध्ये इन्फ्लुएन्झा सदृश लक्षणे आढळल्यास कोणती उपाययोजना करायची, त्यासंबंधी या सूचना आहेत. सध्या मुंबईत इन्फ्लुएन्झाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या मार्गदर्शक सूचना जारी केल्याचे पालिकेने म्हटले आहे. कफ, सर्दी, घसादुखी,अंगदुखी, डोकेदुखी, थंडी भरून येणे आणि थकवा अशी इन्फ्लुएन्झा सदृश आजाराची लक्षणे आहेत.
सौम्य ताप (३८ अंश सेल्सियस किंवा १००.४ पेक्षा कमी), कफ, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया आणि उलटी अशी प्राथमिक लक्षणे असल्यास रुग्णांना सामान्य औषधे द्यावीत आणि २४ तासांनी पुनर्तपासणी करावी तसेच घरी विलगीकरणाचा सल्ला द्यावा. मात्र सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ओसेल्टॅमिवीर देऊ नये, अशा पालिकेच्या सूचना आहेत.
ताप ३८ अंश सेल्सियसहून अधिक आणि तीव्र घसादुखी, नाक गळती आणि कफ, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी ही लक्षणे असलेल्या रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवावेत. अशा रुग्णांना ऑसेल्टॅमिवीरची आवश्यकता असेल.
ज्या रुग्णामध्ये वरील सर्व लक्षणांसह धाप लागणे, छातीत दुखणे, कफातून रक्त पडणे, नखे निळसर पडणे आणि विशेषत: मुलांमध्ये चिडचिड आणि गुंगी अशी लक्षणे असतील तर अशा सर्व रुग्णांची स्वॅब चाचणी घ्यावी आणि त्यांना ऑसेल्टॅमिविर आणि रुग्णालयात दाखल करण्याची सूचना पालिकेने डॉक्टरांना दिली आहे.