एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक
यांची पुन्हा पोलीस दलात बदली

मुंबई – एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली. सध्या नायक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. बदलीबाबतचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. त्यानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नायक यांचाही समावेश असल्याने मुंबई पोलीस दलात ते रुजू होणार आहेत.
सोमवारी पोलीस दलात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली. तर, नागिन काळे, कैलास बोंद्रे, अशोक उगले, रमेश यादव, मुरलीधर करपे यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. दया नायक यांची ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून आहे. नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अनेकांचे एन्काऊंटरही केले आहेत.
२०२१ मध्ये अँटेलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली. ही बदली प्रशासकीय असल्याचे कारण देण्यात आले. मात्र, बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले. मॅटने या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर नायक एटीएसमध्ये कार्यरत होते. मात्र आता त्यांची बदली पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात करण्यात आली आहे.

Scroll to Top