एप्रिल महिन्यापासून मुंबईतील
भटक्या कुत्र्यांची गणना होणार

मुंबई – मुंबईत दरवर्षी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे हजारो मुंबईकरांना फटका बसत असतो.त्यामुळे आता येत्या एप्रिल महिन्यापासून मुंबईतील भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील २४ वॉर्डात जीपीएस मॅपिंगद्वारे ही गणना होणार आहे. गणना झालेल्या कुत्र्यांवर विशिष्ट खूण केली जाणार आहे. याआधी भटक्या कुत्र्यांची गणना ही २०१४ मध्ये झाली होती. सध्या मुंबईत जवळपास तीन लाखांच्या घरात भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई पालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी पावले उचलूनही सातत्याने या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली आहे. गेल्या आठ वर्षांत मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दोन लाखांनी वाढ झाली आहे. पालिकेकडून मोठ्या प्रमाणात निर्बीजीकरणासाठी खर्च करूनही या प्रयत्नामध्ये फारसे यश येताना दिसत नाही. पहाटे कामावर जाणार्‍या आणि रात्री उशिरा घरी येणार्‍या मुंबईकरांना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याचा मोठा उपद्रव सहन करावा लागतो.
त्याचप्रमाणे कुत्र्यांबरोबर भटक्या मांजराच्या त्रासामुळे पालिकेने २०१९ पासून यांचीही नसबंदी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत ६३९२ मांजरांची नसबंदी केली आहे. २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार ९५ हजार १७२ भटके कुत्रे असल्याचे समोर आले होते.त्यानंतरही गेल्या आठ वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०१४ नंतर भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणानंतरही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत २,१, ४९८ इतकी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये गणना केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Scroll to Top