मुंबई
एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचे हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी आता सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध राज्य लोकसेवा आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आता नवी मुंबई पोलीस आणि सायबर सेल करणार आहे.
तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट एका टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. त्यानंतर गोंधळ उडाल्यानंतर राज्य लोकसेवा आयोग सतर्क झाले. आता सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले होते. आयोगावरच कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
एमपीएससी हॉलतिकीट हॅक प्रकरणी गुन्हा दाखल
