गडचिरोली – राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातील एसटी बसचा एक व्हिडिओ काही दिवसांपासुन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या बसचे छप्पर उडत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी एसटी महामंडाळावर टीका केली. त्यानंतर महामंडळाने या व्हिडिओप्रकरणी खुलासा केला असून अहेरी आगारातील अभियंत्याला निलंबित केले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक एसटी बस छप्पर उडाले असतानाही धावताना दिसत आहे. या बसमध्ये दहा प्रवासी होते. पावसाचे पाणी आत येत असल्याने प्रवाशांनी आणि चालकाने छत्री घेऊन जवळपास ५० किमी अंतर ही बस चालवल्याचे बसचालकाने सांगितले आहे. याची दखल घेत आता या बसच्या दुरूस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहीत वेळेत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत संबंधीत यंत्र अभियंता शि. रा.बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे. यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात, असे निर्देश आगार व्यवस्थापनाला दिले आहेत.