अहमदनगर:
राज्याच्या एसटीच्या वाटचालीचे साक्षीदार एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. बुधवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. १ जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी दुःख देणारी असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत लक्ष्मण केवटे यांना आदरांजली वाहिली आहे. १९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केल्याचे सांगत, त्यांची सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच एसटी महामंडळाकडून देखील त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
राज्यातील पहिली एसटी बस सेवा १९४८ मध्ये अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली होती. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. एसटीचे वाहक म्हणून लक्ष्मण केवटे आणि चालक म्हणून किसन राऊत यांच्याकडे जबाबदारी होती. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून ३० एप्रिल १९८४ रोजी सेवानिवृत्त झाले होते.