महामंडळाने दिला इशारा
मुंबई – राज्यातील विविध एसटी स्थानके आणि आगारात ‘नाथजल’ या एसटी महामंडळाच्या अधिकृत बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याची मुभा आहे.मात्र स्टॉलधारक बाटली थंड करण्याचे शुल्क म्हणून प्रवाशांकडून अतिरिक्त पाच रुपये वसूल करीत आहेत. त्यामुळे १५ रुपयांच्या बाटलीबंद पाण्यासाठी एसटी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागत आहेत.असे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असूनही महामंडळ त्याकडे कानाडोळा करत होते.मात्र याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याने आता एसटी महामंडळाने स्टॉल धारकावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
जादा दराने ‘ नाथजल ” ची विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित स्टॉल धारकांवर दंडात्मक कारवाई करत त्याचा परवानाही रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
विशेष म्हणजे ‘नाथजल’चा खप वाढवण्यासाठी एसटी स्थानक आणि आगारांतील स्टॉलमध्ये अन्य ब्रँडेड बाटलीबंद पाणी विकण्यास महामंडळाने मनाई केली आहे. मात्र काही स्थानकांत एसटीचे अधिकृत बाटलीबंद पाणी कमाल किमतीपेक्षा जास्त रुपयांना विकले जाते. ‘बाटलीवर किंमत १५ रुपये आहे,मग अतिरिक्त ५ रुपये का आकारण्यात येतात,’ याविषयी स्टॉलवरील विक्रेत्याला विचारले असता,‘थंड करण्याचे शुल्क’ आहे, असे सांगितले जाते. मुंबईसह राज्यात देखील याच पद्धतीने सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाईचा इशारा दिला आहे.