मुंबई – एसटी महामंडळाची ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ ही लोकोपयोगी आणि प्रवाशांच्या फायद्याची योजना महामंडळाच्या दुर्लक्षामुळे बंद पडली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटी बसगाड्यांना गर्दी लाभलेली असतानाच ही योजना बंद झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
एसटी महामंडळातील हॉटेल व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नाममात्र दरात चहा-नाश्ता प्रवाशांना उपलब्ध व्हावा, यासाठी स्वस्त अल्पोपहार ही योजना आधीच्या युती सरकारने सुरू केली. माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर ८ जुलै २०१६ पासून राज्यातील सर्व उपहारगृहांमध्ये प्रवाशांनी याचा लाभ घेण्यास सुरूवात केली. मात्र कोरोना काळात वाहतूक बंदच असल्याने स्वस्त अल्पोपाहार योजनाही बंदच होती.
कोरोनानंतर वाहतूक सुरळीत झाली. पुढे राज्यात सत्तांतरही झाले.उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांचे सरकार आले.‘आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे’, असे सरकारी घोषवाक्य सर्व जाहिरातीमधून दिसू लागले. पण ही जनहिताची योजना बंदच कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या योजनेची माहिती देणारे फलक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांवरून दिसेनासे झाले आहेत.दरम्यान, एसटीचे तिकीट दाखवून ३० रुपयांत चहा-नाश्त्याची मागणी केली असता ही योजना महामंडळाकडून बंद केली असल्याचे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.