एसीपी नितीन बोबडे यांचे
ड्युटीवर असताना निधन

मुंबई – मुंबईतील सर्वात मोठे, विस्तारित सागरी पोलीस ठाणे असलेल्या येलो गेट पोलीस स्टेशन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन बोबडे यांचे काल दुपारी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ५५ वर्षांचे होते.बोबडे कार्यालयात असतानाच दुपारी दोन ते चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नितीन बोबडे हे काल सकाळी १० च्या सुमारास कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान बोबडे यांनी जेवण केले आणि त्यानंतर ते कक्षात विश्रांती घेत होते. दरम्यान दुपारी पावणे चारच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी दार वाजवल्यानंतर त्यांनी आतून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.यामुळे कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहिले तेव्हा बोबडे कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीच प्रयत्न केले मात्र त्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यांच्या मृत्यूने पोलिस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नितीन बोबडे यांनी याआधी मानखुर्द आणि माटुंगा पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन काम केले होते.काही वर्षांपूर्वी त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली होती.त्यावेळी ते सहा महिने वैद्यकीय रजेवर होते.त्यांना काही दिवसांपासुन पुन्हा त्रास होत असल्याने ते अस्वस्थ असायचे. ते नेरुळ येथे आपली पत्नी आणि मुलीसह राहत होते.

Scroll to Top