सिडनी – जागतिक तापमान वाढीचा परिणाम आता विविध पातळ्यांवर दिसून येत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीत यंदाच्या हिवाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सिडनी शहरापासून नैऋत्य दिशेला असलेल्या दुर्गम भागात गेल्या दोन दिवसांत ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.ऑस्ट्रेलियाच्या याम्पी येथील लष्करी प्रशिक्षण स्थळाजवळ काल या तापमानाची नोंद करण्यात आली असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत शून्य पूर्णांक ४ अंश अधिक असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलियात नोंदवण्यात आलेले हे सर्वाधित ताममान असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. या आधी २०२० सालच्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ४१.०२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदाचा हिवाळाही सर्वाधिक तापमानाचा असेल अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी या आधीच व्यक्त केली होती. जागतिक हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे की, जगभरातील कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे ही तापमान वाढ नोंदवली जात आहे.