उरण – मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात तेलाचा जाड थर पसरल्याने समुद्र काळवंडल्याचा प्रकार काल शुक्रवारी पहाटे दिसून आला. त्यामुळे परिसरातील मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओएनजीसीच्या उरण प्रकल्पातील क्रूड ऑईल साठवणीच्या नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे गळती झाल्याने हे जलप्रदूषण झाले आहे.
ओएनजीसी व्यवस्थापनाला गळतीची माहिती मिळाल्यानंतर पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले तेलाचे जाड थर कामगार लावून ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले. मात्र नाल्यातून वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहोचल्याने पाण्यावर तवंग दिसत होते. त्याचप्रमाणे गळतीमुळे किनाऱ्यावर जमा झालेले तेल जमा करण्याचे पहाटेपासूनच युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. समुद्रात जाण्याआधीच तेल जमा करण्यात आल्याने परिसरातील मासेमारी, शेती आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांनी म्हटले आहे.
दरम्यान,ओएनजीसीत वारंवार घडणाऱ्या तेल गळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी तेल गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. उरण ओएनजीसी प्रकल्पातून जुने जाणकार आणि अनुभवी कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. नव्याने भरती झालेले अधिकारी आणि कामगार यांना प्रकल्पाची फारशी माहिती नसल्यामुळेच प्रकल्पात वारंवार तेल गळतीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक कामगारांकडून केला जात आहे.