मुंबई : गेल्या आठवड्यात २४ फेब्रुवारीला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या प्लॅटफॉर्ममधून २६ वर्षीय इलेक्ट्रिकल इंजिनीअर एनोस वर्गीस बेपत्ता झाला आहे. या घटनेनंतर पोलीस एनोसचा तपास करत आहेत. पण ते हे काम गांभीर्याने करत नसल्याचा आरोप त्याचे वडिल निवृत्त लष्करी अधिकारी रेजी वर्गीस यांनी केला आहे. एनोसबाबत घातपात झाल्याचा त्यांचा आरोप असून, पोलिसांनी कसून तपास करायला हवा अशी मागणी त्यांचाकडून केली जात आहे.
गुजरातमधील सिस्टीम प्रोटेक्शन या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करत होता. त्या कंपनीने बॉम्बे हाय साउथ येथील ओएनजीसी प्लॅटफॉर्मवर १२ फेब्रुवारीला आपले काही कर्मचारी पाठवले होते. त्यांच्याबरोबर एनोसदेखील होता. त्यांनतर तो गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की ओएनजीसीतील एनोसच्या सहकार्यांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले, डीसीपी पोर्ट झोन यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि एनोसच्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
माझ्या मुलाचा मृतदेहही सापडला नाही. पण तो आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता.हे वेगळेच काहीतरी घडले आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा सखोल तपास करावा अशी इच्छा असल्याचे इनोसचे वडिल रेजी वर्गीस म्हणाले.