मुंबई
मुंबईतील घाटकोपरमध्ये अंगावर घोंगडी टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या कंबलबाबावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. हा कंबलबाबा राजस्थानातील एक भोंदूबाबा आहे, तो विकलांग लोकांवर कथाकथित उपचार करतो.
मागील १० वर्षे महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. या भोंदूबाबावर पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंनिसाच्या वतीने मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली.