बंगळुरू :कन्नड अभिनेता नितीन गोपीचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. नितीन गोपीचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छातीत दुखू लागल्याने त्यास जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. नितीन गोपी आपल्या आई-वडिलांसोबत बंगळुरू येथील निवासस्थानी राहत होते.
नितीन गोपी यांनी १९९६ मध्ये बाल कलाकार म्हणून कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. बालकलाकार म्हणून नितीन गोपीने हॅलो डॅडी या चित्रपटात दिग्गज अभिनेते डॉ. विष्णुवर्धन यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर केली. त्याने विशुवर्धनच्या मुलाची भूमिका साकारली. प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती.
मुथिनंथा हेंडथी, केरलिदा केसरी, निशब्धा, चिराबांदव्य आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय साकारला आहे. श्रुती नायडू निर्मित पुनर्विवाह या मालिकेतही नितीन मुख्य भूमिकेत दिसला होता. हर हर महादेव या भक्ती मालिकेच्या काही भागांमध्येही त्यांनी काम केले. कन्नड चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पुनीत राजकुमार, लक्ष्मण, मनदीप रॉय, बुलेट प्रकाश यांच्या मृत्यूतून इंडस्ट्री अजून सावरलेली नाही, अशातच नितीन गोपीच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.