बंगळुरू –
कर्नाटक सरकारने नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सहकार मंत्री के. एन. राजन्ना, कर्नाटक दूध महासंघ, जिल्हा दूध सहकारी संस्था आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीच्या बाबतीत कर्नाटक दूध महासंघाने सरकारकडे प्रतिलिटर ५ रुपये वाढीची मागणी केली होती. मात्र, सिद्धरामय्यांनी प्रतिलिटर ३ रुपये दूध दरवाढीला संमती दर्शविली आहे. त्यामुळे ग्राहकांना दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सहकारमंत्री के. एन. राजण्णा म्हणाले आम्ही, बैठकीत केएमएफच्या अधिकाऱ्यांनी ५ रुपये प्रतिलिटर दूध दरवाढीची मागणी केली. मात्र, सरकारने ३ रुपये दरवाढीला मान्यता दिली आहे.
या बैठकीत केएमएफचे अध्यक्ष आमदार भीमा नायक, माजी मंत्री एच. डी. रेवण्णा तसेच केएमएफचे सर्व संचालक, सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.