मुंबई:- मुंबईतील बेस्ट बसवर चला कर्नाटक बघुया अशा आशयाची जाहिरात लावण्यात आली आहे. आता या जाहिरातींवरुन राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. हा मराठी माणसाच्या हृदयाला काढलेला चिमटा आहे. या बेस्ट बसवरील जाहिराती काढा नाहीतर बेस्ट फोडणार, असा थेट इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरू आहे. त्याच कर्नाटकला छाताडावर बसवण्याचे काम सरकार करत आहे. बेस्ट बसवर \’चला कर्नाटक नव्याने पाहूया\’ अशा प्रकारे जाहिरात करण्यात आली आहे. ही जाहिरात काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बेस्ट बसचा एक फोटोही ट्विट केला आहे. ज्यावर कर्नाटक पर्यटनाबाबत जाहिरात छापली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तणाव गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.