खानापूर – कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चोफेर हल्ला चढवला. कर्नाटकात आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या निवडणुकीत कर्नाटकातील जनता भाजपला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याच बरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी शिंदे-फडणवीस पैसे पुरवीत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी सांगितले, एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे हुतात्म्यांचा अपमान आहे. भाजपासारखे पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी पैसा पुरवत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार हे सीमाभागातील मराठी माणसांशी बेईमानी करत आहेत. एकीकरण समितीला येथे पाठिंबा दिला पाहिजे, एकीकरण समितीला गरज पडल्यास मी पुन्हा सोबत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी माणसांनी सीमाभागात आपण एकजुटीनं काम करू व भाजपचा दारूण पराभव होताना येथे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कर्नाटकमध्ये मजबूत होताना दिसत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधकांना आता येथे शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी मराठी माणसांविरोधात येथे प्रचार करू नये, असेही त्यांनी शिंदे फडणवीस यांना बजावले आहे.
कर्नाटकातील जनता भाजपाला हद्दपार करणार! राऊतांचा हल्ला
