बंगळुरू – कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने मुलींच्या शालेय गणवेषात स्कर्टऐवजी चुडीदार किंवा पँट, असा बदल करण्याची शिफारस राज्याच्या शिक्षण विभागाला केली आहे. कलबुर्गी येथील महिला व बालकल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी स्कर्ट परिधान करणाऱ्या मुलींना होणाऱ्या गैरसोयींबाबत आयोगाला दिलेल्या पत्रानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.
आयोगाला १५ मे रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुली लाजाळू स्वभावाच्या असतात आणि प्रवास करताना, गर्दीच्या ठिकाणी फिरताना, सायकल चालवताना किंवा क्रीडांमध्ये भाग घेताना स्कर्ट घालणे त्यांना संकोच निर्माण करणारे ठरते. या पत्रात लैंगिक छळाबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचाही उल्लेख आहेत. मुलींनी अनेकदा स्कर्ट घालण्याबाबत आपले मत व्यक्त केली असून त्यांचा गणवेश चुडीदार किंवा पँटमध्ये असा बदलण्याची सूचना त्यात केली होती. त्यामुळे आयोगाने शिक्षण विभागाच्या आयुक्तांना पत्र लिहून गणवेषबदल करण्याची शिफारस केली आहे.