कर्नाटक निवडणूक पार्श्वभूमीवर अमित शहा येडियुरप्पांच्या घरी

बेंगळुरू- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी शहा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या भेटीला गेले होते. यावेळी शहा यांचे येडियुरप्पा आणि त्यांचा मुलगा विजयेंद्र यांनी स्वागत केले. शहा यांनी येडियुरप्पा यांच्या घरी जाऊन विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिंकुमार कटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. सकाळच्या नाश्त्यासोबतच अमित शाहही या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. यासोबतच मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेतला.फेब्रुवारीमध्ये बीएस येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. विधानसभेतील शेवटच्या भाषणात ते म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, माझ्या पक्षाला विजयी करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. भाजपला पुन्हा विजय मिळवून देणे हेच आपले एकमेव ध्येय असून यावेळीही भाजपचाच विजय होईल, अशी खात्रीही त्यांनी दिली होती.

Scroll to Top