कल्याण – कल्याणच्या पश्चिमेकडील आग्रा रोडवरील प्रसिद्ध दक्षिणमुखी मारुती मंदिरात चोरीची घटना घडली. चोरट्यांने चांदीची गदा, हार आणि छत्रासह दानपेटीतील रोकड आणि मंदिरातील वायफायचे राऊटर, सीसीटीव्ही कॅमे-यासह, डीव्हीआरही लंपास केला. भिवंडी पोलिसांनी सापळा रचून ही चोरी करणाऱ्या चोरट्याला २४ तासांत अटक केली असून त्याचे नाव साकीब ऊर्फ सलमान मोहंमद अख्तर अन्सारी (२४) असे आहे.
या चोरट्याने मध्यरात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सव्वा किलोची चांदीची गदा, चांदीचा हार,चांदीचे छत्र, चांदीचा मुकुट, चांदीचा रुईच्या पानांचा हार, टाळ आणि दानपेटीतील ६४७० रुपयाची रोख लंपास केली होती. तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआरही लंपास केला. नेहमीप्रमाणे सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून कल्याण आणि भिवंडी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. त्यानंतर चोरटा भिवंडी पोलिसांच्या जाळ्यात ल सापडला. साकीब असे या चोराचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कल्याणच्या हनुमान मंदिरात चोरी! चांदीची गदा लंपास! चोरटा अटकेत
