कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली-तीन तासांनंतर लोकलसेवा सुरळीत कल्याण ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर जवळपास तीन तासांनंतर लोकल सेवा सुरळीत झाली.ओव्हरहेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबली. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ओव्हरहेड वायर तुटल्याने कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. लोकल ट्रेनच्या लांबच लांब रांगा लागल्या. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेने नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. त्यांनतर ठाणे, ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.लांबच्या प्रवाशांना प्रवास करत असलेल्या ट्रेनमध्ये थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान, जवळ राहणाऱ्या अनेक प्रवाशांनी ट्रॅकवरुन पायी जाणे पसंत केले. सव्वा पाच वाजताच्या सुमारास लोकल सेवा पूर्ववत झाली तरी एकामागोमाग एक ट्रेन असल्याने अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणाऱ्या जलद लोकल २५ ते ३० मिनिटे तर अप आणि डाऊन जाणाऱ्या स्लो लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. काही लोकल ट्रेन रद्दही करण्यात आल्या.पाच दिवसापूर्वी इंजिन फेलमुळे वाहतूक खोळंबली होती. इंजिनचे ब्रेक निकामी झाल्याने मालगाडी बदलापूरमधील होम फलाटात शिरल्याची विचित्र घटना घडली. या फलाटावरून काही सेकंदांपूर्वीच एक लोकल मार्गस्थ झाल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, होम फलाटात शिरल्यानंतर मालगाडीचे इंजिन बंद झाल्याने अप आणि डाउन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
