नाशिक
राज्यातील जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच, पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होऊ लागला आहे.
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव घसरल्याने गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह दिंडोरी, कळवण येथे शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. निर्यातक्षम टोमॅटोला प्रतिकिलो चार रुपयांपर्यंत तर, लाल टोमॅटोला प्रति जाळी २० ते ८० रुपये भाव मिळाल्याने बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
बुलढाणा जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. टोमॅटो लागवडीसाठी हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांना भावाअभावी शेतातच टोमॅटो पीक सोडून द्यावे लागत आहे. शासनाने अशा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर करावे, अशी मागणी उत्पादक शेतकरी करत आहेत. आधी अस्मानी संकट आणि नंतर सुलतानी संकट या फेऱ्यात शेतकरी यंदा अडकला आहे. उत्पन्नाच्या काळातच टोमॅटोला फक्त दीड ते दोन रुपये किलोचा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.