चांदवड :- कांदा, द्राक्ष यांसह भाजीपाल्याचे दर पडलेले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथे आंदोलन केले. या आंदोलनात माजी खासदार समीर भुजबळ सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्तींनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. शेतकरी प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. कांद्याचे दर, द्राक्षाचे पडलेले दर, वाढती महागाई या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु झाले होते.
दरम्यान, राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही बाजार समितीमध्ये अद्याप नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेले आश्वासन हवेतच विरले की काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.