अहमदनगर
महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन संचालनालयाकडून भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात दरवर्षी काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, या महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांकडून निसर्ग पायदळी तुडवला जात असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे काजवा महोत्सव रद्द करावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून ते जुनच्या पहिल्या पावसाच्या आगमनापर्यंत काजवा महोत्सव भरतो, संध्याकाळी सहा ते मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिक, मुंबई, पुणे, नगरसह राज्यभरातून इथे आलेल्या पर्यटकांचा धिंगाणा खुलेआम सुरु असतो. त्याचबरोबर अनेक पर्यटकांकडून मद्यसेवनही इथे केले जाते. एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे निसर्गामधील महत्त्वाचा असलेला व दुर्मीळ झालेला जीव काजवा संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. त्यामुळे काजवा महोत्सवावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून वनविभागाकडे करण्यात आली.