मुंबई- कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर परिचारिका उद्या मोर्चा काढणार आहेत. विविध मागण्यांसाठी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून दुपारी २ वाजता कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागातील सहाय्यक परिचारिका, प्रसविका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिकांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभाग येथे धडकणार आहे.
पहिल्या, दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा मोबदला पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ द्यावा, सर्व संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरावी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, सहाय्यक परिचारिका प्रसविका, समन्वयक, आया कमर्चाऱ्यांसाठी रजा राखीव पदे तत्काळ निर्माण करावी, डॉक्टरांच्या उपस्थितीविना नियमित लसीकरण कार्यक्रमाची सक्ती करू नये, इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागातील सहाय्यक परिचारिका प्रसविका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका यांचे विविध प्रश्न आणि मागण्या मागील अनेक महिन्यांपासून दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्यात येत आहेत. मात्र, या मागण्या आणि प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासन अनास्था दाखवत आहे. त्यामुळे परिचारिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या परिचारिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान, या मोर्चानंतर सकारात्मक निर्णय न झाल्यास, होणाऱ्या सभेमध्ये पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती दि म्युनिसिपल युनियन सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली.