नांदेड – नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे राम नवमी प्रकरणी आयोजित धर्मसभेत चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्याविरोधात दंगल भडकणे, सामाजिक सौंहार्द बिघडवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे यांसारख्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात कलम १५३ अ, २९५ अ आणि ५०५-२ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बिलोली येथे 9 एप्रिलरोजी राम नवमीनिमित्त ही धर्मासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून कालीचरण महाराज यांनी भाषण केले होते. नांदेड येथील रामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत कालीचरण महाराजांनी एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भारतात दंगली एका विशिष्ट समाजामुळेच होतात, असे कालीचरण महाराज म्हणाले होते. कालीचरण महाराजांनी त्यांच्या भाषणादरम्यान लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.