हरिद्वार – कावड यात्रेचे पावित्र्य जपण्याच्या नावाखाली स्थानिक प्रशासनाने कावड मार्गावरील मशिदी आणि कबरी कापडी पडदे लावून झाकण्याचा अजब निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला कडाडून विरोध होऊ लागताच काही तासांत प्रशासनाने सपशेल माघार घेत झाकलेल्या मशिदी पुन्हा खुल्या केल्या.
हरिद्वार प्रशासनाच्या आदेशावरून इस्लामनगरमधील मशीद, हाय ब्रिजवरील एक कबर आणि अन्य काही ठिकाणे कापडी पडदे लावून झाकण्यात आली होती. मात्र याची कुणकुण लागताच मुस्लीम समाजातून तीव्र संताप होऊ लागला. हा वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे अवघ्या काही तासांत आपल्या निर्णयावर यू-टर्न घेत हरियाणा प्रशासनाने मशिदी आणि कबरी कावड यात्रेकरूंच्या नजरेस पडू नयेत म्हणून लावलेले
पडदे काढून टाकले.
स्थानिक मुल्ला-मौलवी आणि रहिवाशांनी हरिद्वार प्रशासनाच्या या निर्णयावर कडाडून टीका केली. हिंदू धर्मियांना खूश करण्यासाठी प्रशासनाने मुस्लिमांवर अन्याय केला, अशी टीका त्यांनी केली. दुसरीकडे कावड यात्रेवर असलेल्या हिंदू भाविकांनी मात्र या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काही यात्रेकरुंनी प्रशासनाचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे असे म्हटले. तर काहींनी निर्णय अनावश्यक धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे, असे सांगितले. दरम्यान, हरिद्वारचे जिल्हाधिकारी धीरज सिंह गर्बयाल यांनी असा दावा केला की, गेल्या वर्षीदेखील असाच प्रकार कावड यात्रेदरम्यान मशिदी पडदे लावून झाकण्यात आल्या होत्या. त्यात नवीन काहीच नाही.
