सातारा- जागतिक वारसा स्थळ आणि विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांचा सडा बहरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले हळूहळू या कास पठाराकडे वळत असल्याचे दिसत आहे. सध्या या परिसरात हलका पाऊस पडत असून दाट धुके आणि बोचरा गार वारा असे आल्हाददायक वातावरण आहे.
पुढील चार दिवसानंतर कास पठारावर खर्या अर्थाने फुलांच्या रंगांची उधळण करताना पाहायला मिळणार आहे.सध्या चवर,पांढर्या रंगाची पंद,आषाढ बाहुली, गजरा अमरी, गेंदफुल आदी फुले दिसत आहेत. तसेच वृक्ष,झुडपे, ऑर्किड आणि डबक्यातील वनस्पतीही बहरू लागल्या आहेत. कास पठारावर दररोज तीन हजार पर्यटक भेट देत असतात. याठिकाणी येण्यासाठी आधी www.kas.ind.in या संकेतस्थळावर बुकिंग करावे लागत आहे. काही पर्यटक फुलांच्या भागात प्रवेश करत असल्याने कास पठार समितीने फुलांच्या संरक्षणासाठी तात्पुरती तंगूस जाळी लावली आहे. कास तलाव सध्या तुडुंब भरून वाहत आहे. या पठाराला २०१२ मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. २१ देशांच्या सभासदांसमोर हा बहुमान मिळाला आहे. या पठारावरील फुले पाहण्यासाठी पर्यटकांना प्रति व्यक्ति १५० रूपये खर्च करावे लागणार आहेत. पार्किंग शुल्क आणि बसचे शुल्क मात्र माफ करण्यात आले आहे.