किम जोंग उनच्या बहिणीने दिली
अमेरिका,दक्षिण कोरियाला धमकी

प्योंगयांग- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची बहीण किम यो जोंग आता त्या देशातील एक शक्तिशाली नेता म्हणून समोर येत आहे. किमच्या बहिणीने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला धमकी दिली आहे, उत्तर कोरिया या दोन देशांविरुद्ध ‘सक्त कारवाई’ करण्यास तयार आहे, असे तिने म्हटले आहे.
अलिकडेच अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या युद्धविमानांसोबत संयुक्त सराव केला. अमेरिकेने कोरियन द्वीपकल्पावर आण्विक-सक्षम बी-५२ बॉम्बर उडवल्यानंतर किम यो जोंगने हे विधान केले आहे.
“आम्ही अमेरिकन सैन्य आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यावर बारीक लक्ष ठेऊन आहोत. त्यांच्याविरोधात आम्ही सक्त कारवाई करण्यास तयार आहोत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी हालचाली आणि सर्व प्रकारच्या वक्तृत्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अर्थातच उत्तर कोरिया त्यांच्याशी सामना करण्यासाठी नेहमीच तयार असेल.” असे किम यो जोंग यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.दरम्यान,अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे सैन्य या महिन्याच्या शेवटी सर्वात मोठा फील्ड सराव करण्याची तयारी करत आहे. अमेरिका-दक्षिण कोरियाच्या लष्करी सरावाला उत्तर कोरियाने वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत.येत्या १३ ते २३ मार्च या कालावधीत दक्षिण कोरिया आणि यूएस सैन्य संगणक-सिम्युलेटेड कमांड पोस्ट प्रशिक्षण घेणार आहेत.तसेच २०१८ मध्ये आयोजित केलेला फील्ड सराव पुन्हा करतील, असे दक्षिण कोरिया आणि यूएस सैन्याने घोषित केले आहे.

Scroll to Top