कुरुलकरांच्या पॉलिग्राफ चाचणीचा ‘एटीएस’चा अर्ज कोर्टाने फेटाळला

पुणे – पाकिस्तानी हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि आवाजाची चाचणी करण्याबाबत दहशतवादविरोधी पथकाकडून दाखल करण्यात आलेला अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी शनिवारी याबाबतचे आदेश दिले.
कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयात नमूद केले होते. कुरुलकर यांनी मोबाईलमधील काही डाटा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तो परत मिळवायचा आहे. कुरुलकर बऱ्याच गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी व्हॉइस लेयर सायकोलॉजिकल अॅनालिसीस चाचणी करायची आहे. पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. मात्र, व्हॉइस लेयर चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नसते, असे फरगडे यांनी युक्तिवादात सांगितले होते.
त्यावर न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांना व्हॉइस लेयर अॅनालिसीस चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का, अशी विचारणा एटीएस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, एटीएसच्या अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने चाचणीबाबत सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले होते. दरम्यान, डॉ. कुरुलकरने या दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top