नवी दिल्ली – राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर अत्याचार केल्याचे आरोप करत कृस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतरवर महिनाभरापासून ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप ब्रजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुस्तीपटूंसह खाप महापंचायत उद्या दिल्लीतील इंडिया गेटवर कॅण्डल मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर २८ मे रोजी नव्या संसद भवनासमोर महिलांची खाप महापंचायत भरणार आहे.
हरियाणातील रोहतकमध्ये झालेल्या खाप महापंचायतमध्ये हरियाणा, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील खाप प्रतिनिधीही हजर होते. शेतकरी नेते राजेश टिकैत यांच्यासह आंदोलक कुस्तीपटूंनी या महापंचायतला हजेरी लावली. रविवारी सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही खाप महापंचायत सांयकाळी ४ वाजेपर्यत चालली. या महापंचायतमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इंडिया गेटवर मंगळवारी होणाऱ्या कॅण्डल मोर्चा देशभरातील नागरिक सहभागी होतील. नव्या संसद भवनासमोर महिलांच्या महापंचायतमध्येही देशभरातील महिलांसह खाप आणि शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, ब्रजभूषण यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही आंदोलक कुस्तीपटूंकडून करण्यात आली. त्यानंतर ब्रजभूषण यांनी ही मागणी मान्य करत कुस्तीपटूंचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ही मागणी कुस्तीपटूंनी स्वीकारत आमचीही नार्को टेस्ट करा, असे म्हटले आहे.
कुस्तीपटू इंडिया गेटवर आज कॅण्डल मोर्चा काढणार
