नवी दिल्ली
कुस्ती संघटनेच्या निवडणुका येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर (आयओए) ४५ दिवसांत निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपविली असली, तरी सध्या तात्पुरती समितीन विविध कुस्ती उपक्रम सुरू करण्यात व्यस्त आहे. भारतीय कुस्ती महासंघाचा कारभार चालविण्यासाठी आयओएची तात्पुरती समिती स्थापन करून दोन आठवडे झाले, मात्र निवडणुकीच्या दृष्टीने अद्याप कोणतीही कामे सुरु केलेली नाहीत.
समितीच्या तीन सदस्यांपैकी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती अद्याप झालेली नाही. आयओए अध्यक्षा पी. टी. उषा आणि सहसचिव कल्याण चौबे हे निवडणूक घेण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने आयओएवर निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपविलेल्या हंगामी समितीमध्ये आयओएचे कार्यकारी सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा आणि ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर यांचा समावेश आहे. तिसरा सदस्य म्हणून निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती केली जाणार आहे.