कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी संतोष वेणीकर उपजिल्हाधिकारी

नांदेड : राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी संतोष वेणीकरची चक्क यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संतोष वेणीकर या घोटाळ्याप्रकरणी वर्षभर तुरुंगात होते. कोरोनानंतर त्यांना जामीन मिळाला होता. आढावा समितीने या प्रकरणाचा आढावा घेऊन त्यांची महसूल खात्यात अकार्यकारी पदावर नेमणूक करण्याची शिफारस केली. त्यानुसार वेणीकर यांना उपजिल्हाधिकारी भूसंपादन लाभक्षेत्र यवतमाळ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

राज्यभर खळबळ माजवणारा कृष्णूर धान्य घोटाळा १८ जुलै २०१८ रोजी नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी उघड केला. त्यांनी धान्य घेऊन जाणारे १९ ट्रक पकडले. त्यात स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे गहू, तांदूळ होते. याप्रकरणी सर्व पुरावे जमा झाल्यानंतर १९ जणांविरुद्ध दोषारोपत्र दाखल झाले होते. कृष्णूर धान्य घोटाळा घडला त्यावेळी नांदेडच्या जिल्हा पुरवठा अधिकारीपदी संतोष वेणीकर होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधातही कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा होता. त्यानंतर ते तब्बल साडेतीन वर्षे भूमिगत होते. मात्र, पोलिसी दट्ट्याने ते १६ जून २०२२ ला शरण आले. वेणीकरांना एक वर्ष तुरुंगात घालवावे लागले. कोरोनानंतर ते जामिनावर बाहेर आले. आता कृष्णूर घोटाळा प्रकरणाचा आढावा समितीने आढावा घेतला. त्यानंतर संतोष वेणीकर यांची महसूल खात्यात अकार्यकारी पदावर नेमणूक करण्याची शिफारस झाली.अखेर वेणीकर यांना यवतमाळ येथे भूसंपादन लाभक्षेत्राचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top