ओटावा – कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. ओंटारियो प्रांतातील विंडसर शहरातील हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असून या मंदिराच्या भिंतीवर भारताविरोधी द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हे कृत्य करणारे दोघेजण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले त्यांचा सुरू आहे.
विंडसर पोलिसांनी सांगितले की, श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर काळ्या रंगात हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये काही लोक तोडफोड करताना दिसत आहेत.हिंदू मंदिराची तोडफोड ही द्वेषपूर्ण घटना म्हणून चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ मिळवला आहे, त्यात मध्यरात्री १२ वाजल्यानंतर दोन संशयित या परिसरात दिसत आहेत.त्यातील व्हिडिओमध्ये एक संशयित इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे तर दुसरा त्याच्या बाजूला उभा आहे. एका संशयिताने काळ्या रंगाचा स्वेटर, डाव्या पायात पांढर्या रंगाचा लहान लोगो असलेली काळी पॅन्ट आणि काळ्या-पांढऱ्या उंच-टॉप रनिंग शूज घातले होते. दुसऱ्या संशयिताने काळी पँट, स्वेटशर्ट, काळे शूज आणि पांढरे मोजे घातले होते.
दरम्यान,कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, मात्र आजतागायत तिथल्या सरकारने कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. विंडसरमधील मंदिराची तोडफोड होण्याची ही पाचवी घटना आहे.