मुंबई – मुंबई महापालिकेचे १९२६ साली स्थापन झालेले केईएम रुग्णालय आता येत्या २६ मे रोजी आपली १०० वर्षे पूर्ण करणार आहे. विशेष म्हणजे या शतकोत्तर दिनी या रुग्णालय परिसरात सेंटेनरी भवन १ या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम होणार आहे. केईएम अर्थात किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय १०० वर्षे पूर्ण करत असल्याने या इमारतीला सेंटेनरी असे नाव दिले जाणार आहे.
या रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, सेंटेनरी १ आणि सेंटेनरी २ अशा दोन इमारती या रुग्णालय परिसरात बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या इमारतीचा पायाभरणी सोहळा २६ मे रोजी होणार असून त्याची सर्व प्रक्रिया पुढील आठवडय़ात पूर्ण केली जाईल. ही इमारत १२ मजली असून तेथे रक्तपेढी स्थलांतरीत केली जाणार आहे. तसेच या इमारतीत क्लिनिकल आणि प्रयोगशाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी ऑडिटोरियम उभारले जाणार आहे. या ऑडिटोरियममध्ये किमान २५० पेक्षा जास्त विद्यार्थी बसू शकतील असे हे लेक्चर थिएटर असले पाहिजे असे राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने म्हटले आहे.तशा पद्धतीनेच त्याची केलेली असेल.ही इमारत किमान ३ वर्षांत बांधुन पूर्ण होईल.ही इमारत पूर्ण झाल्यानंतर भविष्यात दुसरी इमारत बांधली जाईल.तिचा प्रस्ताव तयार आहे,मात्र या इमारत बांधकामाला काही वर्षे प्रतिक्षा करावी लागेल असे, या रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.