नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने सरकारी निवासस्थानाला राजमहल असे नाव देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली.
दिल्ली भाजपने आरोप केला आहे की, ‘आम्ही कार, बंगला घेणार नाही, असे सांगणाऱ्या केजरीवालांनी बंगल्याच्या दुरुस्तीवर ४५ कोटी रुपये खर्च केले. केजरीवाल यांनी प्रत्येक स्क्रीनवर आठ लाख रुपये खर्च केले आहेत.’ भाजपने तपासाच्या आधारे ४५ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला नसला तरी छापून आलेल्या वृत्ताचा हवाला देत भाजपने हे आरोप केले आहेत. या अहवालाला ‘ऑपरेशन शीशमहल’ असे नाव देण्यात आले आहे.