डेहराडून – उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची दारे सहा महिन्याच्या कालावधीनंतर अखेर उघडली. या क्षणाचे औचित्य साधून मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या सजावटीसाठी तब्बल 20 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला. संपूर्ण जगात 11 वे ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असणार्या भगवान केदारनाथांच्या मंदिराची दारे आज सकाळी परंपरागत पूजा- अर्चा पार पाडल्यानंतर खोलण्यात आली. यावेळी आठ हजार भाविक उपस्थित होते.
उत्तराखंडची चारधाम यात्रा 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे. शनिवारी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचा दरवाजा उघडला असून 27 एप्रिलला बद्रिनाथ धामचा दरवाजा उघडणार आहे. केदारनाथ मंदिर 22 एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेलाच खुले होणार होते . मात्र, प्रचंड बर्फवृष्टी आणि पावसामुळे 25 एप्रिल ही तारीख ठरवण्यात आली. अशातच, हवामान खात्याने 29 एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवल्याने, राज्य सरकारने रविवारी केदारनाथसाठी भाविकांची नोंदणी 30 तारखेपर्यंत थांबवली. दरम्यान, ऋषिकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी आणि सोनप्रयागसह अनेक ठिकाणी यात्रेकरूंना सध्या तिथेच थांबण्यास सांगितले आहे.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले 20 क्विंटल फुलांनी मंदिर सजवले
