तिरुवनंतपुरम :
केरळमधील कोझिकोड शहरात निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या जिल्ह्यांना प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे. कोझिकोडमध्ये सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर ७ ग्रामपंचायतींना कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमधील सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना मास्क घालणे बंधनकारक आहे. फक्त औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडण्यास परवानगी आहे.
बुधवारी राज्य सरकारने विधानसभेत सांगितले की, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची (एनआयव्ही) टीम आज केरळमध्ये येणार आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये एक लॅब बांधली जाईल, ज्यामध्ये एनआयव्ही टीम निपाह चाचणी आणि वटवाघळांचे सर्वेक्षण करेल. याशिवाय मंगळवारी रात्री केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी निपाह विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च सोबतही चर्चा केली आहे आणि राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.