कोलंबियात लष्कराचे हेलिकॉप्टर
कोसळले! चार जणांचा मृत्यू

बोगोता : दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये रविवारी १९ मार्चला दुपारच्या सुमारास क्विब्डो भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टर अपघातात चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या वृत्ताची पुष्टी केली. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्करी हेलिकॉप्टर पुरवठा ऑपरेशन करत होते. मात्र, उंचावर असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते खाली कोसळले.

हेलिकॉप्टर कोसळतानाची थरारक घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. कोलंबीयातील चोकोमधील क्विडो परिसरात एक लष्करी हेलिकॉप्टर हवेतून खाली पडले. जे स्वत:भोवती फिरता फिरता जमीनीच्या दिशेने खाली आले आणि शहराजवळच्या झाडीत कोसळले. जॉइंट टास्क फोर्स टायटनचे कमांडर कर्नल हेक्टर अल्फोन्सो कँडेलारियो यांनी सांगितले की, अपघातात हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले होते. हेक्टर जेरेझ ओचोआ, ज्युलिथ गार्सिया कॉर्डेरो, जोहान ओरोज्को आणि रुबेन लेगुइझामोन अशी मृत लष्करी अधिकाऱ्यांची नावे आहेत. या अपघाताला दुजोरा देताना कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले की, या अपघातात कोणीही वाचले नाही. पेट्रो यांनी मृत अधिकार्‍यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला.

Scroll to Top