कोल्हापूर- अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या विजेच्या उच्च प्रवाहित तारेला चिकटून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अप्पाजी नामदेव पोवार (१९) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री कात्यायानी येथे घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पाजी कॅटरर्सकडे कामाला होता. विविध मंगल कार्यालय, लाॅन, खासगी शेती फाॅर्म येथे रोजच्या मानधनावर तो काम करत होता. गुरुवारी सायंकाळी तो इतर सहकाऱ्यांसोबत कात्यायानीजवळील एका फाॅर्म हाउसवर कामासाठी गेले होता. तेथून रात्री उशिरा काम आटोपून १२:३० च्या सुमारास अप्पाजी आणि त्याचे दोन सहकारी दुचाकीवरून घरी चालले होते. यावेळी अप्पाजीने लघुशंकेसाठी दुचाकी थांबविण्यास सांगितली.
पाऊस पडल्याने येथे थांबायला नको, असे मित्रांनी त्याला सल्ला दिला. मात्र, तरीही त्याने दुचाकी थांबवा, असे सांगितले. यावेळी तो झाडाच्या आडोशाला जात असतानाच रस्त्याकडेला पडलेली डीपीला जोडलेली उच्च प्रवाहित विजेची तार त्याच्या गळ्याला चिकटली. त्यामुळे त्याचा क्षणार्धात तडफडून मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरीही अप्पाजी न आल्याने मित्रांनी त्याला आवाज द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मोबाइलच्या उजेडात शोध घेतला असता अप्पाजी जमिनीवर पडलेला दिसला. एका मित्राने पोलिस, अग्निशमन दलासह इतर मित्र आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी मदतीसाठी संर्पक साधला. घटनास्थळी वीज वितरण कर्मचारी दाखल झाले. त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर इतरांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.